तुंग किल्ला प्रवेशद्वार |
तुंग किल्ला
किल्ल्याचे नाव: तुंग /कठिण गड
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा: पुणे
जवळचे गाव: लोणावळा
उंची: ३०००फूट
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत.त्यातीलच एक पवन मावळ! या प्रांतात निसर्गाची मनसोक्त उधळण पहायला मिळते, उंच डोंगर,धडकी भरवणारे उभे कडे,दऱ्यांतून वाहणारे पाणी, धबधबे अशा संपूर्ण वातावरणा मुळे आपसूकच पर्यटकांची पावले या भागात वळतात. याच पवन मावळात मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे किल्ले आहेत.
तुंग किल्ला माहिती:
पवन मावळात लोहगड, विसापूर, तुंग, आणि तिकोना हे किल्ले आहेत.यातील तुंग किल्लाची माहिती पाहत असताना त्यांचे भौगोलिक स्थान खूप महत्त्वाचे मानले जाते. पूर्वीच्या काळी बोरघाट या व्यापारी मार्गावर लक्ष देण्यासाठी व पवन मावळातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत असे.
तुंग किल्ला कुठे आहे:
सह्याद्री पर्वत रांगा ची उपरांग लोणावळा या डोंगररांगेत तुंग किल्ला बांधला आहे. तुंग किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये असून पुण्यापासून त्याचे अंतर ६१ किलोमीटर तर मुंबईपासून १३० किलोमीटर आहे. तुंग हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची ३००० फूट एवढी आहे.याला कठीणगड असे ही म्हणतात. कठीण गड या नावावरून किल्ला चढण्यासाठी अवघड आहे असे वाटू शकेल परंतु ट्रेकिंगच्या दृष्टीने गड सोपा समजला जातो. तुंग म्हणजे उतुंग! या किल्ल्यांची नैसर्गिक रचना वैशिष्टपूर्ण असल्यामुळे याला तटबंदीची गरज भासत नाही. पवना जलाशयाचा याला तिन्ही बाजूंनी वेढा आहे, तुंग आणि तिकोना हे जवळ जवळचे किल्ले असून काही पर्यटक तुंग तिकोना असा ट्रेक करतात.
तुंग किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:
तुंग किल्ल्याचा प्रवास तुंग वाडी गावातून सुरू होतो. वाडीतून गडाकडे जाणाऱ्या वाटेवर भैरवनाथाचे मंदिर लागते. मंदिर तसे छोटे असले तरी सभामंडप प्रशस्त असून कौलारू छप्पराचा आहे. या मंदिरामध्ये पाच सहा जणांच्या राहण्याची सोय होऊ शकते.या मंदिराच्या आवारात काही अज्ञात विरांच्या विरगळी उभ्या पहायला मिळतात.या नक्की कोणाच्या असाव्यात हे जरी सांगता येत नसले तरी गावकरी यातील एका विरगळीला तुळाजीलाव असे संबोधतात.
पायरी मार्ग |
पायऱ्या चढून गेल्यावर सुरवातीला गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे,याचा जिर्णोद्धार करण्याची गरज आहे.
याच्या पोटामध्ये लगेच गडाचे दुसरे प्रवेशद्वार आहे.दोन्ही दरवाजांची रचना वैशिष्टपूर्ण असून जवळ गेल्याशिवाय ते दिसत नाहीत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या बैठकीसाठी देवड्या पाहायला मिळतात.
दरवाजाच्या उजव्या बाजूस गणपतीचे छोटेसे मंदिर आहे. त्याच्या समोरील बाजूस काही जुन्या वस्तूंच्या बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. मंदिराच्या मागील बाजूस खडकामध्ये एक मोठे टाके असून यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या दिल्या आहेत. याच्या बाजूलाच तटामध्ये बांधलेला टेहळणी बुरुज नजरेस पडतो. ह्यासारखे अजूनही इतर ठिकाणी तीन-चार बुरुज तसेच अन्य वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात.
प्रवेशद्वार |
बालेकिल्ल्याच्या वाटेवर खडकात खोदलेले खांब टाके पहायला मिळतात , त्याचे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात या टाक्यांमध्ये साठला आहे.
बालेकिल्ला खूपच आटोपशीर असून चारी बाजूने उभा ताशीव कडा आहे. बालेकिल्ल्यावर तूंगाईचे मंदिर असून मंदिराला प्रदक्षिणा घालण्या एवढीच जागा पाहायला मिळते. याठिकाणी समोरील बाजूस उभ्या खडकामध्ये खोदलेली एक खोली पाहायला मिळते. या खोलीच्या आतील बाजूस हवा व प्रकाशासाठी झरोका पाहायला मिळतो. काहींच्या मते ही पाण्याची टाकी असावी. पावसाळ्या व्यतिरिक्त या ठिकाणी दोन-तीन जणांच्या मुक्कामाची सोय होऊ शकते.
तुंग किल्ल्याचा इतिहास:
या किल्ल्याची निर्मिती कधी केली हे जरी निश्चित सांगता येत नसले तरी या किल्ल्याचे अस्तित्व प्राचीन असावे.मराठा इतिहासामध्ये तुंग किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या मोहीमां पासून पाहायला मिळतो. मावळ प्रांतातील इतर किल्ल्याबरोबर इ.स. १६५७ मध्ये तुंग हे शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला. नेताजी पालकर याच मावळातील चौक या गावचे असल्याने त्यांना या प्रांताच्या सुरक्षेची जबाबदारी स्वप्नात आली होती.
तुंग किल्ला बूरुज |
मे १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंग व दिलेरखानाने या भागात आक्रमण केले. या आक्रमणा वेळी त्यांना कोणताही गड काबीज न करता आल्याने त्यांनी गडाखालील अनेक गावे जाळली. ११ जून १६६५ सालच्या पुरंदर तहानुसार मोगलांना जे तेविस किल्ले द्यावे लागले त्यात तुंग चा ही समावेश होता. तहानुसार कुतुब खान व हलालखान याने या परिसरातील सारे किल्ले आपल्या ताब्यात घेतले.
परंतु थोड्या दिवसांमध्ये मराठ्यांनी तुंग सह सर्व किल्ले पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतले.
ताराबाईंनी कान्होजी आंग्रे यांना शाहू महाराजांवर हल्ला करण्यास भाग पाडले या अनुषंगाने आंग्रे कुलाबा येथून जे निघाले ते सपाट्याने अनेक प्रदेश व किल्ले जिंकत पुढे मावळा आले. त्यांनी तुंग सहित तिकोना लोहगड विसापूर हे महत्त्वाचे किल्ले जिंकून घेतले. शाहू महाराजांनी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना अंग्रे चा सामना करायला मावळात पाठवले. पेशव्यांनी मुत्सद्दीपणाने अंग्रेंना शाहूंच्या पक्षात वळून घेतले, व तह करून सारे किल्ले शाहू ना परत मिळवून दिले.
इ.स.१८१८ पर्यंत तुंग किल्ला मराठा साम्राज्य राहिला. इंग्रज-मराठा लढाईनंतर तो ब्रिटिशअधिपत्याखाली आला.
तुंगला जायचे कसे:
तुंग गडावर जाण्यासाठी जे मार्ग आहेत ते तुंगवाडीतून आहेत. पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या लगत किल्ला असल्याने मुंबईकडून येणारे लोणावळ्यातून तर पुण्याहून येणारे मळवली तुन तुंगला जाऊ शकतात.
घुसळखांब मार्गे:
लोणावळ्यातून कुर्वंडे घुसळखांब मार्गे जाता येते. हा मार्ग मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्यापासून जातो. लोणावळा बस स्थानकातून या मार्गावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा सुरू आहे. घुसळखांब येथे उतरून पुढचा पाणी प्रवास करून गडावर जावे लागते. खाजगी गाडीने येणाऱ्यांसाठी हा रोड उत्तम आहे.
तिकोना पेठ मार्गे:
तिकोना पेठेतून कामशेत मोरबे एसटी बससेवा सुरू आहे, या गाडीने तुंग फाट्याला उतरुन चाळीस मिनिटांचा पायी प्रवास करून तुंगवाडीत पोहोचता येते. खाजगी वाहनाने येणार असेल तर मळवली लोहमार्ग तिकोना पेठेतून पवना धरणाला वळसा मारून तुंगवाडीत पोहचतो येते.
तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ब्राह्मणोली गावातून तुंग साठी लॉन्च सेवा सुरू आहे. या मार्गाने पवनेच्या जलाशयात नौका विहाराचा आनंद घेता येऊ शकतो.
मळवली किंवा लोणावळा जवळची रेल्वे स्थानके आहेत.
काय काळजी घ्यावी:
- तुंगवाडीत जेवण व नाश्त्याची सोय होऊ शकते.
- गडावर पाणी नसल्याने आपल्याबरोबर पाणी घेऊन जावे
- सार्वजनिक वाहतूक वापर करणार असाल तर एसटी किंवा ट्रेनचे वेळापत्रक पहावे.
- गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात मुक्कामाची सोय होऊ शकते.
- तुंग आणि तिकोना या दोन्ही किल्ल्यांचा ट्रॅक एका दिवसात पूर्ण होऊ शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे