नाव :- रायरेश्वर किल्ला
उंची :- १३३७ मीटर
किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग
डोंगररांग :- महादेव डोंगर
चढाईची श्रेणी :- सोपी
ठिकाण :- रायरेश्वर
तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत
सध्याची स्थिती :- व्यवस्थीत
रायरेश्वर किल्ला माहिती
रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो.
रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
रायरेश्वर चे पठार कुठे आहे
पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी लोखंडी शिडी व रेलिंग बसवले आहे शिडीच्या वाटेने गडाच्या माथ्यावर पोहोचताच,समोरच आपल्याला रायरेश्वराचे अवाढव्य आकाराचे पठार नजरेस पडते. पठाराचा विस्तार 16 किमी इतका प्रचंड पसरला असून या पठारावर पांडवकालीन रायरेश्वराचे मंदिर पाहायला मिळते. या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची१३३७ मिटर इतकी आहे.गडावर पवित्र रायरेश्वर मंदिर, पांडव लेणी, गोमुख तळे व जिवंत झरा असून वर्षाचे १२ महिने या ठिकाणी शुध्द पाणी असते.
मंदिराच्या बाजूला उंच टेकडी असून या टेकडीवरून भवताल चा संपूर्ण परिसर अतिशय मनमोहक दिसतो आकाश स्वच्छ निरभ्र असेल तर या टेकडीवरून प्रतापगड केंजळगड कमळगड विचित्रगड मकरंदगड तसेच तुंग व तिकोना किल्ले सहज दिसतात.
या गडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी सात ते आठ विविध रंगाची माती पाहायला मिळते त्यामध्ये निळी, हिरवी, लाल, तांबडी, पिवळी, काळी, जांभळी आणि निळसर रंगाची माती आढळते. रायरीच्या पठाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात याठिकाणी वाहणारा रिव्हर्स वाटरफाॅल, पावसा ची पाणी पठारावरून खाली न पडता हवेच्या दाबामुळे ते उलट्या दिशेने वाहते. याच बरोबर रिव्हर्स व्हाॅइस पाँइट, सनसेट पाँइट, शिवकालीन तळे अशी अनेक पाहण्यासारखे पाँइट आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्वर:
छत्रपती शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे २७ एप्रिल १६४५ रोजी याच रायरेश्वर पठारावरील रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले, रयतेस परकी आक्रमकांपासून गुलामगिरीपासून मुक्तता मिळवून दिली. मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले. याठिकाणी दिलेली स्वराज्याची संकल्पना संकल्पना पुढे अटक पासून कटक पर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार होण्यापर्यंत झाली.
रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवरायां बरोबर कान्होजी जेधे बाजी पासलकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुदगल नरसप्रभू गुप्ते सोनोपंत डबीर हे बारा मावळातील सवंगडी शपथ वेळी उपस्थित होते. या शपथे नंतर मूठभर मावळ्यांनी दिल्ली व विजापूर या राजसत्तांना पाणी पाजले त्याच बरोबर सिद्धी इंग्रज पोर्तुगीज त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडून त्यांचा बंदोबस्त केला. याच मुळे मराठा साम्राज्य रायरेश्वर चा किल्ला व त्यावरील रायरेश्वर मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे.
रायरेश्वर ला जायचे कसे:
रायरेश्वर ला जाण्यासाठी सर्वप्रथम भोर या शहरात यावे लागते. म्हणजे भोर हे मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे कोणत्याही मार्गाने आल्यास भोर मधूनच रायरेश्वर रस्ता जातो.
टीटे धरण मार्गे
पुण्याहून भोरमार्गे आंबवडे गावातून टिटे धरण मार्गे रायरेश्वरावर जाता येते. ही वाट तशी अवघड असून घाट रस्ता आहे.
रायरी मार्गे
भोर गावातून रायरी मार्गाने सुद्धा जाता येते. या मार्गावर भोर मधून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू आहे. या मार्गावरून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित वापर करणार असाल तर वेळापत्रक पाहून घ्यावे. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण दोन तास लागतात.
केंजळ गडावरून श्वानदरा मार्गे किंवा सुंणदरा मार्गे ही रायरेश्वर असा ट्रेक पुर्ण करता येतो.
काय काळजी घ्यावी:
रायरेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या पत्रांच्या शेड मध्ये मुक्कामाची सोय होऊ शकते.
गडावरील वाडी मध्ये घरगुती जेवणाची व्यवस्था होऊ शकते.
गडावर पाण्याची सोय असून गोमुख तळ्यात वर्षाचे १२ महिने शुध्द पाणी असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे