बारा मोटेची विहीर सातारा |bara motachi vihir information in Marathi
साताऱ्यातील प्रसिद्ध बारा मोटेची विहीर त्यामध्ये असणाऱ्या महाला साठी प्रसिद्ध आहे. सातारा शहरा पासून 16 किलोमीटर तर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गा पासून पूर्वेस चार किलोमीटर अंतरावर कृष्णा नदी च्या काठावर शेरी लिंब या गावामध्ये बारा मोटेची विहीर आहे .
विहिरीचे बांधकाम छत्रपती संभाजी राजांचे पुत्र थोरले शाहू महाराजांच्या काळात झाले. संपूर्ण विहिरीचे बांधकाम काळ्या ताशीव चिरा दगडांमध्ये करण्यात आले असून संपूर्ण बांधकाम चूण्यात केले आहे.
सन १७१९ ते १७२५ या कालखंडात श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले. विहिरीची सर्वसाधारणपणे खोली ११० फूट व्यास ५० फूट एवढा आहे विहिरीचा आकार शिवलिंगा प्रमाणे असून मुख्य विहीर व उपविहीर अशा दोन विहिरी आहेत. मुख्य विहीर अष्टकोनी आकाराची असून उप विहीर आयताकृती आहे. मुख्य विहीर भरल्या नंतर उपविहरीत पाणी येते. विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिनशे वर्षात कधीही आटली नाही.
विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे आत मध्ये दुमजली महाल बांधलेला आहे. विहरीमध्ये उतरण्यासाठी प्रशस्त पायरी मार्ग आहे . तळमजल्यावर मुख्य कमानी दरवाजा आहे. दरवाजावर दोन व्याल शिल्पे कोरलेली आहेत. व्याल म्हणजे सिंहाचा चेहरा व वाघाचे शरीर अशी रचना असते. व्याल हे समृद्धी व शौर्याचे प्रतिक समजले जाते.
महालामध्ये जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराच्या आत मध्ये दोन्ही बाजूला दोन लहान कमानी दरवाजे व जिना बांधला आहे. जिना अरुंद असून एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकते. महाल प्रशस्त असून नक्षीदार खांब त्यावर कोरलेली मनमोहक शिल्पे लक्ष वेधून घेतात. महालाला महिरपी आकाराच्या दगडात कोरलेल्या खिडक्या आहेत. महालामध्ये गणपती, हनुमान, त्रिशूळ सर्प पुष्पे अश्वारूढ व गजारुढ राजांची शिल्पे अशी अनेक शिल्पे कोरलेली आहेत. पडदे बसवण्यासाठी असलेली लोखंडी रिंग ही कोपऱ्यात पहायला मिळते.
अष्ट कोनी विहरीच्या आठ ही कोनात सापाचे शिल्प कोरलेले आहे. विहिरीच्या भिंतीवर मोडी लिपी मध्ये शिलालेख कोरलेला आहे.
या महालामध्ये छत्रपती थोरले शाहू महाराज वास्तव्यास येत असत. विहिरीच्या काठावर तख्ताची जागा असून त्या ठिकाणी दरबाराची व सिंहासनाची जागा दिसते.
या ठिकाणी असलेल्या आमराई मधील ३०० आंब्यांच्या झाडांना पाणी देण्यासाठी व आसपासच्या लोकांना पाणी पिण्यासाठी विहिरीचा वापर होत असे. त्या साठी विहिरीवर पंधरा मोटा बसवण्याची सोय होती.उप विहिरीवर सहा तर मुख्य विहिरीवर नऊ मोठा बसत. परंतू त्यातील बारा मोटाच चालवत असल्याने हिला बारा मोटेची विहीर असे म्हणतात.
बारा मोटेची विहीर पाहण्यास जाण्यासाठी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लिंब फाट्या पासून पुर्वेला ४किमी अंतरावर आहे. सातारा बाजूने जाणाऱ्यांसाठी लिंब खिंडीतून पुढे नागेवाडी तून लिंब ला जाता येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे